देववाणी संस्कृत भाषा !
श्रावण / नारळी पौर्णिमेला संस्कृत भाषा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. या वर्षी ३ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला गेला. या संस्कृत भाषा दिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेचे अभ्यासक अजय लोमटे यांनी लिहिलेला खास साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य च्या वाचकांसाठीचा हा लेख. 

 

 

संस्कृत ही भारताची प्राचीन व धार्मिक भाषा आहे . काही भौतिक तसेच आध्यात्मिक ग्रंथ हे संस्कृत भाषेतच आहेत . विदेशातही संस्कृत शिकवले जाते .  " श्रावण / नारळी पौर्णिमेला "  संस्कृत भाषा दिवस साजरा केला जातो . 

 

 संस्कृत भाषा म्हणजेच पुरातन भाषा मग सध्याच्या आधुनिक काळात या भाषेचे महत्व काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो .  मात्र संस्कृत आणि संस्कृती देशापेक्षा विदेशात जास्त लोकप्रिय आहे . संस्कृत भाषेचे धार्मिक,  आध्यात्मिक , वैज्ञानिक , आधुनिक , इत्यादी क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे . संस्कृत भाषेचे महत्त्व अनेक क्षेत्रांमध्ये आहे. संस्कृत भाषेचे अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत.

 

 सनातन भाषा : संस्कृत भाषा ही सनातन भाषा आहे असे मानले जाते .  सनातन म्हणजे अनादि व अनंत काळापर्यंत असणारी . जोपर्यंत हे विश्व व्यक्त असते ,  तोपर्यंत ही भाषा असते असे मानण्यात येते .

 

 धार्मिक भाषा : संस्कृत भाषा ही हिंदू धर्माची धर्म भाषा आहे . हिंदू धर्मातील ग्रंथ संस्कृत भाषेतच आहेत. तसेच जैन धर्मातील धर्मसूत्रे विविध महत्त्वपूर्ण ग्रंथ व मंत्र हे संस्कृतमध्येच आहेत . बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर असणारा असणारा अश्वघोषलिखित " बुद्धचरितम् " ग्रंथ संस्कृत भाषेतच आहे .

 

 अध्यात्मिक भाषा : आत्मनि एव इति अध्यात्मम् ( म्हणजेच आत्म्याशी / आत्मोन्नतीशी संबंधित विज्ञान म्हणजेच अध्यात्म होय . ) अध्यात्माची भाषा ही संस्कृत आहे , अध्यात्मातील चार पुरुषार्थ ,  मंत्र ,  साधना , ईश्वरप्राप्तीचे विविध योग , अध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ग्रंथ,  वेद ,  उपनिषदे , ब्राह्मणे , आरण्यके ,  श्रुती, स्मृति, पुराणे आदि  सर्व  साहित्य संस्कृत भाषेमध्येच आहे .

 

 विविध भाषांची जननी :  संस्कृत भाषा ही हिंदी ,  मराठी ,  गुजराती , तमिळ ,  इत्यादी विविध भाषांची जननी आहे . हिंदी व मराठी भाषांमधील अनेक शब्द हे संस्कृत भाषेमधून जशास तसे किंवा किंचित बदल करून घेतले गेले आहेत .  एवढेच नव्हे तर लॅटिन ,  इंग्रजी व जर्मनी यांसारख्या विदेशी भाषांवरही संस्कृत भाषेचा प्रभाव दिसून येतो . 

 

संस्कृत भाषेतील अनेक शब्द हे लॅटिन ,  इंग्रजी व जर्मन भाषेतील शब्दांशी साम्य असणारे आहेत. भाऊ या शब्दाला संस्कृतमध्ये भ्राता शब्द ,  इंग्रजीमध्ये Brother हा शब्द तर जर्मनीमध्ये Bruder हा शब्द आहे . आई या शब्दाला संस्कृतमध्ये माता ,  इंग्रजीमध्ये Mother  तर जर्मनीमध्ये Mutter हा शब्द आहे. मनुष्य या शब्दाला संस्कृतमध्ये मनुज / मनु हा शब्द ,  इंग्रजीमध्ये Man तर जर्मनीमध्ये Mann हा शब्द आहे. मंत्री या शब्दाला संस्कृतमध्ये मंत्री हा शब्द , इंग्रजीत Minister तर जर्मनीमध्येसुद्धा  ministerin हा शब्द आहे. जर्मनीतील trigonometrie व इंग्रजीतील trigonometry हा शब्द संस्कृतमधील त्रिकोणमिती या शब्दाशी जुळतो . अशा प्रकारे अनेक लॅटिन ,  इंग्रजी , जर्मन शब्दांवर संस्कृत भाषेचा प्रभाव दिसून येतो .

 

 

 वैज्ञानिक भाषा  : विशेषं ज्ञानं इति विज्ञानम् ( विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान होय ) , प्राचीन भारतीय विज्ञान हे खूपच प्रगत होते व प्राचीन भारतीय विज्ञानाची भाषा ही संस्कृत होती. विमानाचा शोध हा विसाव्या शतकात लागला असे आपण म्हणतो मात्र प्राचीन काळामध्ये भारद्वाज यांनी लिहिलेल्या विमानशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांची वर्णन व उल्लेख आहे . तसेच नवग्रह , २७ नक्षत्रे ,  सूर्य- चंद्र  यांची स्थाने ,  सूर्य - पृथ्वी - चंद्र ग्रहणकाळ यांसारख्या विविध वैज्ञानिक व खगोलशास्त्राशी संबंधित गोष्टीसुद्धा संस्कृत साहित्यामध्ये फार प्राचीन काळापासून उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर भौतिकशास्त्र ,  रसायनशास्त्र ,  जीवशास्त्र ,  पर्जन्यशास्त्र ,  आयुर्वेद , इत्यादी शास्त्रांवर त्या काळात ग्रंथ लिहिले गेले .

 

 विदेशामध्ये लोकप्रियता : 

संस्कृत भाषा ही फक्त भारतामध्येच लोकप्रिय आहे असे नाही ,  तर नेपाळ , श्रीलंका या ठिकाणीसुद्धा संस्कृत भाषेचा वापर होतो. सूरीनाम देशाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी वेद ग्रंथावर हात ठेवून संस्कृतमध्ये शपथ घेतली . सूरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवरील ब्राझील देशाच्या जवळ असलेला देश आहे . संस्कृत भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्लंड , आयर्लंड ,  जर्मनी , यांसारख्या ठिकाणी  देशांमधील  शाळांमध्ये संस्कृत विषय हा Compulsory Subject / अनिवार्य विषय  करण्यात आला आहे .

 

नासा या अवकाशयानाशी संबंधित संस्थेकडे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले ताडपत्रावर लिहिलेल्या 60, 000 पांडुलिपी संग्रहित आहेत . विदेशातील लोकांना ही संस्कृत भाषेबद्दल प्रचंड आकर्षण आहे. अमेरिका,  इंग्लंड , जर्मनी विदेशातील शाळांमध्ये संस्कृत भाषेतील प्रार्थना , मंत्रोच्चारण म्हटले गेलेले अनेक व्हिडिओ इंटरनेटवर आजही उपलब्ध आहेत. प्रसिद्ध जर्मन कवी गटे याने कविकुलगुरू कालिदासलिखित " अभिज्ञानशाकुन्तलम् " वाचले ,  तेव्हा तो इतका प्रभावित झाला की आनंदाच्या भरात डोक्यावर घेऊन नाचला. विदेशातील अनेक लोक संस्कृतभाषेत असलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा व संस्कृतीची माहिती देणाऱ्या ग्रंथाचा अनुवाद करून  प्राचीन वारसा व तत्वज्ञान आपापल्या देशात प्रसारित करून भारतीय संस्कृती स्वीकारत आहेत .

 

 प्रशासकीय यंत्रणेमध्ये उपयोग : पोलीस दल ( सद्रक्षणाय खलनिग्रहनाय ) , दूरदर्शन ( सत्यं शिवं सुन्दरम् ) ,  नौदल ( शं नो वरुण:  )  आयुर्विमा संस्था ( योगक्षेमं वहाम्यहम् )  यांसारख्या विविध शासकीय , निमशासकीय व अशासकीय प्रणालींची घोषवाक्ये  ही संस्कृत भाषेतच आहेत . नेपाळ देशाची राष्ट्रीय घोषवाक्य " जननी जन्मभमिश्च स्वर्गादपि गरीयसी " हे आहे .  देशातील  अनेक विद्यापीठांची घोषवाक्येसुद्धा संस्कृत भाषेमध्येच आहेत .

 

 व्यापक साहित्य : संस्कृत भाषेतील साहित्य हे व्यापक आहे . संस्कृत भाषेचे साहित्य हे केवळ धर्म व अध्यात्म यापुरतेच मर्यादित नाही तर आयुर्वेद ,  चिकित्सा यांवर आधारित अनेक ग्रंथ चरक ,  सुश्रुत , वाग्भट यांसारख्या तज्ञ लेखकांनी लिहिले आहेत. रामायण , महाभारत यांसारखे ग्रंथ तत्कालीन धर्म व समाजव्यवस्था यांची माहिती देतात. वेद ,  ब्राह्मणे ,  अरण्यके ,  उपनिषदे ,  श्रुती , स्मृती , शास्त्र , पुराणे यांसारखे ग्रंथ हे धर्म व अध्यात्म यांची माहिती देतात . योगशास्त्रासारखे ग्रंथ हे योगाची माहिती देतात . तसेच आयुर्वेद ,  भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , पर्जन्यशास्त्र , भूगर्भशास्त्र  यांसारख्या अनेक भौतिक गोष्टींवर माहिती देणारे ग्रंथही संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध आहेत . 

 

स्वराज्याचे दुसरे छत्रपती , साहित्यिक ,  संस्कृतपंडीत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी " बुधभूषणम् " ( ज्ञानी व्यक्तींचे भूषण / दागिना )  नावाचा  ग्रंथ लिहिला तो पण संस्कृतमध्येच . छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशीहून रायगडावर आलेले काशीचे विद्वान  पंडित गागाभट्ट यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे संस्कृतवरील प्रभुत्व पाहून ते इतके प्रभावित झाले की पुढे त्यांनी लिहिलेला " समयनय " नावाचा ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ " छत्रपती संभाजी महाराज " यांना अर्पण केला .

 

 महत्वपूर्ण विशेषता :

 

संस्कृत भाषा शिकल्यामुळे बुद्धी कुशाग्र होते तसेच धर्मग्रंथ वाचल्यामुळे व्यक्ती धार्मिक व संस्कारी होते . संस्कृत भाषेमध्ये एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत, उदाहरणार्थ  हत्ती या शब्दाला १००  पेक्षा जास्त समानार्थी शब्द आहेत तर पाणी या शब्दाला ५० पेक्षा जास्त समानार्थी शब्द आहेत. " नासा " च्या म्हणण्यानुसार संस्कृत भाषाही पृथ्वीवरील सर्वात स्पष्ट बोलली जाणारी भाषा आहे . संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे मोजक्याच शब्दांत व्यापक असा अर्थ व्यक्त होतो . संस्कृत भाषेमध्ये शब्दांचा क्रम मागेपुढे बदलला तरी सुद्धा अर्थ बदलत नाही. संस्कृत भाषेमधील विविध वर्णांचा व मंत्रांचा अभ्यास केल्यामुळे जिभेच्या व शरीरातील अन्य मांसपेशींचा व्यायाम होतो. संस्कृत भाषा ही उत्तराखंडची अधिकारी भाषा आहे. कर्नाटक राज्यातील " मुत्तूर् " गावातील सर्व लोक हे संस्कृत भाषेतच बोलतात.  जगामध्ये एकूण 19 पेक्षा जास्त देशांमध्ये संस्कृत शिकवले जाते , तर एकट्या जर्मनीमधील 14 विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते. सुधर्मा नावाचे संस्कृत भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे ज्याचे ऑनलाईन संस्करण आजही उपलब्ध आहे. जुलै १९८७ मध्ये Forbes Magazine मध्ये एक लेख प्रसारित झाला होता त्याच्या अनुसार संस्कृत भाषेला Computer Software साठी सर्वात उत्कृष्ट भाषा मांडण्यात आले होते. संगणकात वापरले जाणारे विविध algorithm  हे संस्कृत भाषेतच बनवले गेले आहेत .

 

     संस्कृतमध्ये करियर : करिअरच्या दृष्टिकोनातून संस्कृत विषय हा महत्त्वपूर्ण विषय आहे.  संस्कृत विषयाला scoring subject मानले जाते. अन्य विषयांच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांना संस्कृत विषयांतच जास्त मार्क पडतात . संस्कृत भाषेच्या भितीपोटी किंवा अन्य करिअरच्या मार्गामुळे दहावी व बारावीनंतर मुले संस्कृतमध्ये करिअर करण्याचे टाळतात .  त्यामुळे संस्कृतभाषेमध्ये Compitation ( स्पर्धा )  खूप कमी आहेत व  संधी जास्त आहेत.  उत्तम संस्कृत शिकलेल्या व्यक्तीला विवाह , यज्ञ व अन्य धार्मिक कार्यक्रम यांसारख्या ठिकाणी पौरोहित्य करता येते.  संस्कृत भाषेतील रामायण ,  भागवत , गीता यांसारख्या ग्रंथावर अध्यापन , कीर्तन , कथावाचन करून अनेक लोक आपली उपजीविका भागवत आहेत.  तसेच आयुर्वेद , वास्तुशास्त्र यांसारख्या ग्रंथाचा वापर करून अनेक लोक धनार्जन करत आहेत.  

 

संस्कृत पुरातत्वखात्याशी संबंधित भाषा असल्यामुळे संस्कृत शिकलेल्या व्यक्तीला पुरातत्व खात्यातही महत्त्व आहे. सर्वसामान्य शाळा , सैनिकी शाळा , सीबीएससी शाळा , सेमी इंग्रजी शाळा व गुरुकुल शाळांमध्ये संस्कृत हा अनिवार्य विषय आहे , त्यामुळे माध्यमिक विभागामध्ये संस्कृत शिक्षक म्हणून संधी उपलब्ध आहेत. संस्कृत शिकल्यानंतर आपण कोचिंग क्लासेसही  काढू शकतो. रामायण , महाभारत , पुराणे यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आधारित सध्या अनेक चित्रपट ,.  मालिका , नाटके पुन्हा पुन्हा येतात तर यांमध्येही संस्कृत जाणकारांची आवश्यकता असते. अशाप्रकारे अनेक क्षेत्रांत  संस्कृत भाषेची खूप आवश्यकता भासते व संस्कृत अध्ययन केल्यानंतरविविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करता येऊ शकतात .

 

अशा या संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने विविध उपक्रम राबवले पाहिजेत. मुलांच्या मनात असलेली संस्कृत भाषेबद्दलची भीती नष्ट करून मुलांमध्ये सुसंस्कार निर्माण करणारी संस्कृत भाषा शिकण्याकडे प्रेरित केले पाहिजे व संस्कृत भाषेमध्ये लिखाण करणाऱ्या नवोदित लेखक , कवी  व साहित्यिक यांना प्रोत्साहन दिले पाहिजे . संस्कृत भाषेमुळेच संस्कृती आहे आणि संस्कृती मुळीच भारतीय देश  सर्वोच्च आहे .

 

 


अजय अण्णासाहेब लोमटे

भ्रमणभाष : ९११२१४७४५६